(संगमेश्वर / एजाज पटेल)
८ आणि ९ मे रोजी आलेल्या अवकाळी वादळाने संगमेश्वर तालुक्यात मोठा कहर केला. सुसाट वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे महावितरणची वीज यंत्रणा अक्षरशः कोलमडून पडली. अनेक गावांतील वीज खांब उन्मळून पडले, वीजवाहिन्या तुटल्या आणि शेकडो गावे अंधारात बुडाली. मात्र, या संकटाच्या काळात महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी जीवाची पर्वा न करता रणांगणात उतरले आणि अवघ्या काही दिवसांत बहुतांश भागातील वीजपुरवठा पूर्ववत करून दाखवला.
वादळाच्या तडाख्यात संगमेश्वर कार्यक्षेत्रातील तब्बल १०० पेक्षा जास्त वीज खांब कोसळले. यामध्ये ६० लघुदाब आणि ८ उच्चदाब खांबांचा समावेश होता. मुचरी गवळवाडी येथे अवजड डीपीसह वीज खांब कोसळल्याने मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणचे सुमारे ६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाले असून अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
वादळ ओसरल्यानंतर लगेचच महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीच्या कामाला लागले. डोंगरदऱ्या, चिखलमय रस्ते, ओढे-नाले आणि दुर्गम वाड्यांमध्ये पोहोचत त्यांनी अवजड लोखंडी खांब खांद्यावर वाहून नेले. रणरणते ऊन, दमछाक करणारी परिस्थिती आणि जीव धोक्यात घालणारे वातावरण असूनही कर्मचाऱ्यांनी हार मानली नाही. “जनतेच्या घरात पुन्हा उजेड आणायचाच,” या निर्धाराने त्यांनी दिवस-रात्र काम सुरू ठेवले.
विशेषतः नदी आणि खाडी परिसरातील कामे अत्यंत आव्हानात्मक ठरली. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या पाण्यात पडल्या होत्या. दलदलीतून आणि निसरड्या जमिनीवरून खांब वाहून नेणे, तुटलेल्या तारा जोडणे आणि पुन्हा वीजपुरवठा सुरू करणे हे काम जिवावर बेतणारे होते. तरीही कर्मचाऱ्यांनी धैर्याने ही जबाबदारी पार पाडली.
सध्या बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले असून काही अतिदुर्गम भागांत युद्धपातळीवर काम सुरू आहे. उर्वरित गावांमध्येही लवकरच वीजपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती महावितरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या संपूर्ण कामात ग्रामस्थांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक गावांतील तरुणांनी वीज खांब वाहून नेणे, झाडांच्या फांद्या हटवणे आणि दुरुस्तीच्या कामात मदत केली. ग्रामस्थांच्या या सहकार्यामुळे कामाचा वेग वाढला, अशी भावना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
संगमेश्वरमधील घराघरात पुन्हा लागलेला प्रत्येक दिवा हा महावितरणच्या विजदूतांच्या अथक परिश्रमांची आणि कर्तव्यनिष्ठेची साक्ष देत आहे. संकटाच्या काळात जनतेसाठी झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर आता सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

