( रत्नागिरी / चिपळूण )
जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीला आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेला चिपळूण पोलिसांनी आणखी एक यश मिळवून दिले आहे. चिपळूण शहरातील वालोपे रेल्वे स्थानकासमोर छापा टाकून पोलिसांनी ५३० ग्रॅम वजनाचा गांजासदृश अंमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणी एका ४८ वर्षीय संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई शुक्रवार, ३१ जुलै रोजी करण्यात आली.
जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक ३१ जुलै रोजी परिसरात गस्त घालत होते.
संशयास्पद हालचालींवरून पोलिसांची कारवाई
गस्तीदरम्यान वालोपे रेल्वे स्थानकासमोरील साई मंदिराजवळ एक व्यक्ती हातात पिशवी घेऊन संशयास्पदरीत्या वावरताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी तातडीने दोन पंचांसमक्ष त्याला थांबवून चौकशी केली. चौकशीत त्याने आपले नाव अब्दुल गफ्फार हमीद म्हालदार (वय ४८, रा. चिवेली मोहल्ला, ता. चिपळूण) असे सांगितले. पंचांसमक्ष त्याच्याकडील पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीची झडती घेतली असता, त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत ५३० ग्रॅम वजनाचा गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. जप्त केलेल्या पदार्थाची अंदाजे किंमत ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या ताब्यात बाळगल्याप्रकरणी संशयित अब्दुल गफ्फार म्हालदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२३/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब), २(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, पोलीस हवालदार संदीप माणके, वृषाल शेटकर, रोशन पवार तसेच पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वनगे आणि रुपेश जोगी (१३१५) यांनी सहभाग घेतला.

