(लांजा / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी पुलाजवळ शनिवारी (१ ऑगस्ट) दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकांच्या भीषण अपघातानंतर एका ट्रकला आग लागल्याची गंभीर घटना घडली. अपघातात ट्रक चालक आणि त्याच्यासोबत असलेला सहकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर डिझेल टँकरने पेट घेतल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजस्थानमधील उदयपूर येथील दीपक साळवी (वय ३०) हा ट्रक (क्र. RJ-27-GD-9798) मुंबईहून गोव्याच्या दिशेने घेऊन जात होता. अंजनारी पुलाजवळील वळणावर वेगावर नियंत्रण न राहिल्याने त्याच्या ट्रकने समोर असलेल्या KL-29-J-9721 या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रक डिव्हायडरवर आदळला आणि दुसऱ्या मार्गिकेत पलटी झाला. अपघातानंतर ट्रकमधील डिझेल टाकीने पेट घेतल्याने संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रत्नागिरी एमआयडीसी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
या अपघातात चालक दीपक साळवी आणि हर्षसिंग खेमलालजी राजपूत (वय २३, रा. उदयपूर, राजस्थान) हे गंभीर जखमी झाले. श्री सांबरे यांच्या रुग्णवाहिकेतून दोघांना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, ईगल इन्फ्रा कंपनीच्या जेसीबी आणि दोन हायड्राच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. हातखंबा महामार्ग पोलिसांनी तत्परता दाखवत वाहतूक दुसऱ्या मार्गिकेवर वळवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवली.
घटनास्थळी लांजा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कदम, लांजा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. बगळे, हातखंबा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पीएसआय पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

