(देवरुख)
संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथे नुकत्याच झालेल्या केंद्रस्तरीय इंग्रजी शब्दपाठांतर स्पर्धेत आंगवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा इयत्ता चौथीचा विद्यार्थी सोहम निलेश जाधव याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे आंगवली पंचक्रोशीतून त्याचे अभिनंदन होत आहे. सोहम हा पत्रकार निलेश जाधव यांचा सुपूत्र आहे.
मारळ येथील जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळेत ही स्पर्धा पार पडली. मारळ, आंगवली, बामणोली, कासारकोळवण, आंगवली रेवाळेवाडी, निवधे, मारळ धनगरवाडी आणि बोंड्ये अशा आठ शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
स्पर्धा चार फेऱ्यांत घेण्यात आली. विद्यार्थ्यांकडून इंग्रजी शब्द लिहून घेणे, ठराविक शब्द वापरणे, विचारलेल्या शब्दांची उत्तरे देणे तसेच अक्षरे मागे पुढे करून अर्थपूर्ण शब्द तयार करणे अशा विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली.
या स्पर्धेच्या वेळी मारळ केंद्रप्रमुख नरेश सावंत, केंद्रातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बामणोली शाळेच्या शिक्षिका संचिता सुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले. केंद्रातील शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

