(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आईच्या मायेचा हृदयस्पर्शी प्रत्यय देणारी घटना हातखंबा तिठा येथे आज शुक्रवारी (३० जानेवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. सुनील कांबळे यांच्या घरासमोर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने मादी माकडाचा जागीच मृत्यू झाला. मात्र धडकेच्या क्षणी तिने आपल्या बाळाला कवेत घेऊन वाचवले आणि स्वतः मृत्यू स्वीकारला.
हातखंबा परिसरात रस्ता क्रॉस करत असताना वाहनाची धडक बसली. या अपघातात मादी माकडाने अखेरच्या क्षणी बाळाला सुरक्षित ठेवत स्वतः रस्त्यावर कोसळली. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी धावले; मात्र तोपर्यंत मादी माकडाचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, माकडाचे बाळ किरकोळ जखमी अवस्थेत, हात व डोक्याला इजा झालेली ओरडताना आढळून आले. या घटनेची माहिती रत्नागिरी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांना कळविण्यात आले. त्यांनी तत्काळ वाहन पाठवून घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांना कळविण्यात आले. त्यांनी तातडीची दखल घेत वनविभागाचे कर्मचारी गुरव व मालप यांना घटनास्थळी रवाना होण्याचे निर्देश दिले. त्यांच्या हस्ते जखमी अवस्थेतील बाळाला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन आवश्यक उपचारांसाठी पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे सुतार यांनी सांगितले.
तसेच अपघातात मृत झालेल्या मादी माकडालाही ताब्यात घेऊन दफन करण्यासाठी नेण्यात आले. या घटनेवरून रस्त्यावरील वाहनचालकांनी वन्यजीवांच्या हालचालींची विशेष काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आईच्या त्यागाने मन हेलावून टाकणाऱ्या या प्रसंगाने ‘मातृत्व’ केवळ माणसांपुरते मर्यादित नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांची तत्परता
घटनेची माहिती दूरध्वनीद्वारे मिळताच रत्नागिरी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांनी क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ हालचाली सुरू केल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी वनविभागाचे कर्मचारी गुरव व मालप यांना तातडीने घटनास्थळी रवाना होण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी अवस्थेतील माकडाच्या बाळाला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले, तसेच अपघातात मृत झालेल्या मादी माकडालाही दफनविधीसाठी हलविण्यात आले. या त्वरित व संवेदनशील कारवाईमुळे वन्यजीव संरक्षणाबाबत प्रशासनाची सजगता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, स्थानिक नागरिकांकडूनही या तत्परतेचे कौतुक करण्यात येत आहे.

