(रत्नागिरी)
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे एकूण ३९२ शेतकऱ्यांचे ११९.७३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, यामुळे १० लाख ४९ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने दिला आहे.
तालुकानिहाय नुकसान : सर्वाधिक फटका खेड तालुक्याला, तर सर्वात कमी नुकसान लांजा तालुक्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
खरीप पिकांवर मोठा परिणाम
जिल्ह्यात खरीप हंगामात भात व नाचणी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. तसेच ८० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिके तर १,८६,६६२ हेक्टर क्षेत्रावर फळबागायती आहे. पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यासह गाळ भातखाचरात साचला. सलग ४-५ दिवस पिके पाण्यात बुडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
एकूण ४४ गावांतील ३९२ शेतकरी बाधित झाले असून, भात, नाचणी, फळपिके व बागायती पिके यांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने अहवालात नमूद केले आहे.

