(मुंबई / रत्नागिरी)
देवळे ग्रामविकास मंडळ मुंबईच्या वतीने रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष विलास चाळके यांची नुकतीच सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे नियुक्तीबद्दल अभिनंदन करत शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या भेटीदरम्यान देवळे गावातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये गावातील पाणीटंचाईचा प्रश्न प्रामुख्याने मांडण्यात आला. गावातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तसेच पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आवश्यक कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी मंडळाच्या कार्यकारिणीने विलास चाळके यांच्याकडे केली.
विलास चाळके यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत, “देवळे गावातील पाणीटंचाईसह सर्व समस्या सोडवण्यासाठी मी स्वतः लक्ष घालून कटिबद्ध राहीन आणि त्या दूर करण्यासाठी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करेन,” असा विश्वास व्यक्त केला.
या सदिच्छा भेटीप्रसंगी देवळे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय काळोखे, उपाध्यक्ष विश्वास घाग, कार्याध्यक्ष राकेश गुरव, खजिनदार रविंद्र पांचाळ, उपसचिव प्रदीप शिंदे, सदस्य अनिल साळवी, विष्णू पांचाळ, रेश्माताई परशेट्ये, शिवसेना युवा नेते प्रसाद आपंडकर, अजय कदम, मंगेश कदम, संतोष कदम, सविता लाखाटे तसेच कुमार ऋत्विक देवरुखकर आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
चर्चेनंतर चहापानाचा कार्यक्रम झाला. यावेळी विलास चाळके यांच्या भावी वाटचालीस पुन्हा एकदा शुभेच्छा देत सदिच्छा भेटीची सांगता करण्यात आली. ही माहिती देवळे ग्रामविकास मंडळ मुंबईचे सचिव ॲड. नीलेश सकपाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


