(मुंबई / वृत्तसंस्था)
कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस सेवा सुरू करण्यास भारतीय रेल्वेने मंजुरी दिली आहे. सुमारे ५१० किलोमीटरच्या मार्गावर ही गाडी दररोज धावणार असून, मुंबई, ठाणे, पनवेलसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अनेक महत्त्वाची स्थानके थेट जोडली जाणार आहेत. प्रस्तावित गाडी गाडी क्रमांक १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि परतीच्या दिशेने १५०८८ सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस या क्रमांकाने धावणार आहे.
रत्नागिरी, चिपळूणसह अनेक स्थानकांवर थांबा
या नवीन दैनिक एक्स्प्रेसला मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांवर व्यावसायिक थांबे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वलिवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांचा समावेश आहे. या सेवेमुळे मुंबई महानगर प्रदेश आणि दक्षिण कोकणातील महत्त्वाची शहरे व तालुके यांच्यात थेट रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे.
पर्यटनासह रोजगार, शिक्षण आणि व्यवसायाला चालना
मुंबई आणि दक्षिण कोकणादरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस सुरू झाल्यामुळे पर्यटक, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, छोटे व्यावसायिक तसेच स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. कोकणातील समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे आणि निसर्ग पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठीही रेल्वे प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
मुंबईकडे शिक्षण, रोजगार किंवा व्यवसायासाठी नियमित प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांसाठीही ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मुंबई आणि कोकणादरम्यान अधिक थेट आणि सोयीचा रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे.
नवीन सेवेमुळे कोकणातील प्रवासी वाहतूक सुलभ होण्याबरोबरच प्रादेशिक आर्थिक विकास, पर्यटन आणि स्थानिक व्यवसायांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वाढती प्रवासी मागणी लक्षात घेता या दैनिक एक्स्प्रेस सेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

