(राजापूर / तुषार पाचलकर)
माजी कृषिमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत हे रविवार, २ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून, त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था असल्याचे पत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. सदाभाऊ खोत हे शनिवार, १ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता कोकणकन्या एक्स्प्रेसने सीएसएमटी येथून राजापूर रोड, जि. रत्नागिरीकडे रवाना होणार आहेत.
रविवारी सकाळी ६ वाजता त्यांचे राजापूर रोड रेल्वे स्थानकावर आगमन होईल. त्यानंतर सकाळी ६.३० वाजता ते तळसवडे, ता. राजापूर येथे आगमन करून राखीव कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सकाळी १० वाजता रॉयल ग्रुप, कोकण आयोजित भव्य चिखल नांगरणी स्पर्धा २०२६ या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ओशिवले (गुरववाडी) माळ, ता. राजापूर येथे होणार आहे.
दुपारी १२ वाजता सदाभाऊ खोत यांचे पाचल, ता. राजापूर येथे आगमन व राखीव कार्यक्रम आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता ते पाचलहून ईश्वरपूरकडे रवाना होतील. त्यांचा प्रवास अनुस्कुरा घाट – मलकापूर – शिराळा – ईश्वरपूर या मार्गाने होणार आहे.
दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेसह नियमानुसार आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या समवेत स्वीय सहाय्यक आदिनाथ कपाळे तसेच वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) विनोद हेमाडे राहणार असल्याचेही पत्रकात नमूद आहे.
सदाभाऊ खोत यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था असल्याने त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच विशेष सुरक्षा शाखेच्या पोलीस नियंत्रण कक्षाला आवश्यक कार्यवाहीसाठी माहिती देण्यात आली आहे.

