( रत्नागिरी / वार्ताहर )
किडनी विकाराने त्रस्त असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा डायलिसिस विभाग मोठी आधारवड ठरत आहे. या विभागामार्फत रुग्णांना मोफत डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून दिली जात असून, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गतही हजारो रुग्णांना उपचाराचा लाभ मिळत आहे.
डायलिसिससाठी यापूर्वी कोल्हापूर, मुंबई अथवा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आर्थिक भार पडत होता. मात्र, आता रत्नागिरीतच मोफत आणि दर्जेदार उपचाराची सुविधा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली डायलिसिस विभागाचे कामकाज सुरू आहे. डॉ. उत्तमराव कांबळे (वैद्यकीय अधिकारी), प्रशिक्षित तंत्रज्ञ, परिचारिका आणि नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. अमेय बेडेकर यांच्या देखरेखीखाली रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
डायलिसिससोबत रक्त तपासण्या, इंजेक्शनही मोफत
डायलिसिस सत्रासोबतच रुग्णांना आवश्यक असलेल्या रक्त तपासण्या तसेच आवश्यक महत्त्वाची इंजेक्शन्सही मोफत उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यामुळे उपचाराचा खर्च कमी होऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार मिळत आहे.
१६ बेड आणि मशीनची सुविधा
रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील डायलिसिस विभागाची सुरुवात २०१३ मध्ये झाली. सध्या या विभागात १६ बेड आणि डायलिसिस मशीन कार्यरत आहेत. त्यापैकी दोन बेड व मशीन पॉझिटिव्ह रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र आयसोलेशन रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आगामी काळात डायलिसिस बेड आणि मशीनची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.
वर्षभरात ९ हजारांहून अधिक डायलिसिस सायकल
डायलिसिस विभागाच्या माध्यमातून दर महिन्याला सुमारे ७० ते ८० नियमित रुग्णांना उपचार दिले जात असून, महिन्याला सुमारे ६५० ते ७०० डायलिसिस सायकल पूर्ण केल्या जातात.
जून २०२५ ते जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील १,०२४ नियमित रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला असून, या कालावधीत तब्बल ९,०७६ डायलिसिस सायकल करण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डायलिसिस विभाग महत्त्वाची आरोग्य सुविधा ठरत आहे.
ग्रामीण आणि गरीब रुग्णांना ‘संजीवनी’
रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील विविध आरोग्य सेवांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण ओपीडी आणि आयपीडी सेवांचा लाभ घेत आहेत. विशेषतः डायलिसिस विभागामुळे ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील महागड्या उपचारांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. रत्नागिरीतच मोफत डायलिसिसची सुविधा उपलब्ध झाल्याने अनेक रुग्णांसाठी ही सेवा खऱ्या अर्थाने ‘संजीवनी’ ठरत आहे.

