( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तालुक्यातील जाकादेवी पंचक्रोशी परिसरात रिक्षा व्यवसायात नव्याने उतरलेल्या चालकांना जुन्या रिक्षाचालकांकडून स्टँडवर गाड्या उभ्या करू न देण्याचा प्रकार समोर आल्याने वातावरण तापले आहे. या कथित प्रकारामुळे नवोदित चालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रश्न अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, त्यांनी संबंधित प्रशासनाकडे थेट धाव घेतली आहे. १८ एप्रिल रोजी जाकादेवी येथे नव्या रिक्षाचालकांना होत असलेल्या त्रासाबाबत तहसीलदार, जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस ठाणे तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) यांना निवेदन सादर करण्यात आले. त्रास देणाऱ्या संबंधित रिक्षाचालकांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रिक्षा स्टँडवर गाड्या उभ्या करण्यास अडथळे निर्माण करणे ही केवळ स्पर्धा नसून, थेट उपजीविकेवर गदा आणणारी बाब असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. “अशा प्रकारची मुजोरी मोडीत काढणे अत्यावश्यक आहे. नियम सर्वांसाठी समान असताना काही जणांनी स्वतःहून ‘मक्तेदारी’ निर्माण करणे योग्य नाही,” असा सूर देखील निवेदनात उमटला आहे. निवेदन सादर करताना रत्नागिरी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, महासचिव बिपिन आयरे, सहसचिव विजय जाधव,उपाध्यक्ष सुनील कांबळे, सचिव विकास सावंत, सुरेश पवार, अरुण जाधव, माजी जिल्हा महासचिव/मुकुंद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणात परिवहन विभागाची भूमिका प्रश्नचिन्हाखाली आली आहे. “रिक्षाचालकांकडून होत असलेल्या या मनमानीवर आर.टी.ओ. अधिकारी कारवाई का करत नाहीत?” असा सवालही आता उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्व चालकांना समान संधी मिळेल, यासाठी स्पष्ट नियमांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणाकडे प्रशासनाने कितपत गांभीर्याने लक्ष दिले जाते आणि संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे जाकादेवी पंचक्रोशीसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

