(दुबई / वृत्तसंस्था)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर यांच्या देश-विदेश अभियान विभागांतर्गत परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या पावन आशीर्वादाने आणि गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत दुबई येथे संस्कार महोत्सव भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
भारतीय भूमीपासून हजारो किलोमीटर दूर वास्तव्यास असलेल्या भारतीय कुटुंबांना आपली संस्कृती, अध्यात्म, कुटुंबव्यवस्था आणि मूल्यसंस्कारांशी जोडण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवाला बालक, युवा, माता-पिता, सेवेकरी आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सातासमुद्रापार राहूनही भारतीय संस्कृती आणि संस्कारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या महोत्सवातून देण्यात आला.
संस्कार महोत्सवामध्ये मूल्यसंस्कार, युवा संस्कार, विवाह संस्कार, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या आधुनिक जीवनशैलीत कुटुंबातील संवाद, मातृ-पितृ भक्ती, कृतज्ञता, सदाचार, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम यांसारख्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यावेळी गुरुपुत्र श्री नितीनभाऊ यांनी उपस्थितांना विविध जीवनोपयोगी विषयांवर मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्याच्या संदर्भात कुटुंब व मित्रांकडून येणारा दबाव, कामाच्या ठिकाणचा तणाव, भविष्याची चिंता, वाढता अधीरपणा तसेच मोबाईल आणि सोशल मीडियाचे व्यसन याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. भावनांवर नियंत्रण, सकारात्मक विचारसरणी आणि मानसिक स्थैर्य यांची गरज त्यांनी स्पष्ट केली.
युवा पिढीसमोरील वाढती स्पर्धा, अपयशाची भीती, आत्मविश्वास, कौशल्यविकास आणि सातत्यपूर्ण शिक्षण यांवरही विशेष भर देण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI मुळे होणाऱ्या बदलांना सामोरे जाताना तांत्रिक कौशल्यांसोबत विवेक, प्रेम, करुणा, नैतिकता आणि मानवी मूल्ये जपणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत ध्यान, प्रार्थना, नामस्मरण, कृतज्ञता आणि सेवाभाव यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगण्यात आले. मुलांमध्ये चांगले संस्कार, शिस्त, एकाग्रता, आत्मविश्वास, सहकार्य आणि जबाबदारीची भावना विकसित करण्यासाठी कुटुंब आणि अध्यात्माची भूमिका महत्त्वाची असल्याचेही प्रतिपादन करण्यात आले.
आध्यात्मिक, सामाजिक, उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, सातासमुद्रापार भारतीय संस्कार जपण्याच्या या कार्याला प्रेरणादायी संबोधले. भारतीय संस्कृती, कुटुंबमूल्ये आणि अध्यात्माचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दुबईतील सेवेकरी व भाविकांसाठी हा संस्कार महोत्सव केवळ एक कार्यक्रम न राहता, मायभूमीच्या संस्कृतीशी भावनिक नाते अधिक दृढ करणारा प्रेरणादायी संस्कारसोहळा ठरला.
“देश बदलला, जीवनशैली बदलली; पण संस्कारांची मुळे आणि गुरुमाऊलींशी जोडलेली श्रद्धेची नाळ कायम आहे,” हा संदेश महोत्सवातून अधोरेखित झाला.


