(रमेश डिके / संगमेश्वर प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकी आणि एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, GJ-05-RD-7266 क्रमांकाची महिंद्रा एक्सयूव्ही कार चिपळूणकडून संगमेश्वरच्या दिशेने जात होती. त्याचवेळी MH-08-Z-1918 क्रमांकाची इनोव्हा कार संगमेश्वरकडून कडवईकडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडत असताना दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, इनोव्हा कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक देत थेट शेजारील दुकानात घुसली. या अपघातामुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली. अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
या भीषण धडकेत दोन्ही कार तसेच दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, वाहनांमधील प्रवासी आणि परिसरातील नागरिक कोणत्याही गंभीर दुखापतीपासून बचावल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मोठी गर्दी करत नेमका अपघात कसा घडला हे जाणून घेण्याचाही प्रयत्न केला.

