(जैतापूर / राजन लाड)
सागरी पोलीस ठाणे नाटेच्या पथकाने अतिशय तत्परता दाखवत अवघ्या १२ तासांच्या आत शाळेतील साहित्य चोरी प्रकरणाचा तपास उकलला असून, आरोपीला अटक करून ₹७,१०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही घटना तुळसुंदे मावळतीवाडी (ता. राजापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक ७ ते ८ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी युवराज बबनराव देशमुख (वय ३५, व्यवसाय – शिक्षक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी शाळा सुटल्यावर त्यांनी सर्व कक्ष लॉक करून घरी परतले. पुढील दिवशी सकाळी शाळेत आल्यावर त्यांना शाळेच्या आवारातील दोन सीसीटीव्ही कॅमेरे गायब, तसेच किचन रुमचे कुलूप तोडून आत ठेवलेले अॅल्युमिनियम पातेले आणि स्टीलचे चमचे चोरीस गेलेले आढळले. सदर प्रकरणी गु.र.नं. ७५/२०२५ बीएनएस कलम ३०५(ड), ३२४(३), ३३१(२) प्रमाणे गुन्हा नोंदवून सागरी पोलीस ठाण्याने तपास सुरू केला.
सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ व्ही. बी. चव्हाण, पोहेकॉ वाय. एस. हुजरे, पोहेकॉ इंगळे, पोकॉ कुसाळे, मपोकॉ/एस.आर. बांदकर यांच्या पथकाने तपास सुरु केला.
गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका इसमाची हालचाल संशयास्पद दिसली. चौकशीत मयुरेश महादेव लाकडे (रा. तुळसुंदे मावळतीवाडी, ता. राजापूर) याच्यावर संशय आला. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून २ सीसीटीव्ही कॅमेरे, ६ अॅल्युमिनियम पातेले आणि ३ स्टीलचे चमचे — असा एकूण ₹७,१०० किंमतीचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक नितीन बगाडे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास पोहेकॉ वाय. एस. हुजरे करीत आहेत.

