(राजापूर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. राजापूर तालुक्यातील ओणी तिवंदामाळ परिसरात सकाळी सुमारे १०:४५ वाजता घडलेल्या या दुर्घटनेत एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चालक महम्मद रिझवान अब्दुल करीम वय २८ मृत झाला असून तो मंगलोर, दक्षिण कन्नड, कर्नाटक येथील होता.
आपल्या ताब्यातील भारत बेन्झ कंपनीचा ट्रक KA 20 AA 3119 घेऊन महम्मद हा गोव्याकडून मुंबईच्या दिशेने चालला होता. सकाळी पावणे अकराच्या दरम्यान ओणी, तिवंदमाळ येथे भरधाव वेगाने तो ट्रक आला असता त्यावेळी तेथे असलेल्या राजस्थानी धाब्यावर Rj 27,GD 0531 या उभ्या असलेल्या ट्रकवर जोरात आढळला त्यामध्ये भरधाव वेगाने आलेल्या ट्रक चालकाला जबरदस्त मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या धडकेचा वेग इतका प्रचंड होता की भारत बेंझ ट्रकच्या केबिनचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.

