(राजापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील गावातील एका नुकत्याच चर्चेत आलेल्या शाळेत दोनच दिवसांपूर्वी घडलेला धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. शालेय सहभोजन कार्यक्रमासाठी जेवण बनविण्याच्या कामासाठी आलेल्या एका महिलेला शाळेतील शिपायाने कोंडून ठेवल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही सहभोजनासाठी मदत करण्यासाठी शाळेत आली होती. यावेळी शिपायाने तिच्याशी अयोग्य वर्तन करत तिला एका खोलीत कोंडून ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर तिला दमदाटी केल्याच्याही चर्चा परिसरात सुरू आहेत. तसेच, मागील काही शालेय घडामोडींमध्येही संबंधित शिपाई वारंवार वादग्रस्त वर्तन करत असल्याचे बोलले जात आहे.
शाळेतील इतर कर्मचारी व येणाऱ्या-जाणाऱ्यांशीही तो दमदाटी व अरेरावी करत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून प्रकरणाची नोंद करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सध्या पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे पुन्हा एकदा ती शाळा चर्चेत आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

