(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण असून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळचीवाडी येथील राधाकृष्ण मंडळ तसेच पिंपळेश्वर मित्र मंडळाला शिवसेनेचे युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट देऊन देवीचे व राधाकृष्णाचे दर्शन घेतले.
या भेटीदरम्यान करक गावाचे सरपंच सुरेश ऐनारकर, शिवसेना पदाधिकारी संदीप बारस्कर, नोंदणीकृत शासकीय ठेकेदार जगदीश उर्फ सोनू पाथरे, वैभव वायकुळ व अमित साळवी यांचा मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ आणि राधाकृष्ण प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी नवरात्रोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली. पदाधिकाऱ्यांनी गावातील तरुणांनी सामाजिक ऐक्य, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरा जपत नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या सर्व कार्यकर्त्यांनी “धार्मिक उत्सव हा केवळ पूजा-अर्चना न राहता समाजातील बांधवांना एकत्र आणणारा उत्सव आहे” असा संदेश या निमित्ताने दिला.
पाचल गावाचे उपसरपंच व राधाकृष्ण मित्र मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आत्माराम सुतार, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते. दर्शनानंतर सर्व मान्यवरांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि आगामी उपक्रमांसाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
गावातील तरुणाईच्या पुढाकारामुळे दरवर्षी नवरात्रोत्सव भव्यतेने व सामाजिक बांधिलकी जपत साजरा होत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले.

