(संगमेश्वर / वार्ताहर)
मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वर तळेकांटे येथे चालकाचा स्विफ्ट डिझायर कारवरील ताबा सुटल्याने कार महामार्गाच्या बाजूला खाली घसरून अपघात झाला. सोमवारी (१४ सप्टेंबर) रात्री सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या दुर्घटनेत कारमधील प्रशांत बाबुराव खामकर (४२, रा. संभव टॉवर, पद्मावती नगर, विरार पश्चिम, मुंबई) यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली.
उपलब्ध माहितीनुसार, सुशील श्रीभगवान सिंग (६०, रा. संभव टॉवर, पद्मावती नगर, विरार पश्चिम, मुंबई) हे स्विफ्ट डिझायर (एमएच ४८ ए ५५१८) कारमधून विरारहून लांजाच्या दिशेने प्रवास करीत होते. तळेकांटे येथे महामार्गावरील डायव्हर्जनचा अंदाज न आल्याने कारवरील त्यांचा ताबा सुटला. त्यानंतर कार महामार्गाच्या बाजूने खाली घसरली आणि अपघात झाला.
अपघातात प्रशांत खामकर यांच्या डाव्या हाताला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी वाहनातून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघातात कारचे नुकसान झाले. महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अपघातग्रस्त कार तत्काळ बाजूला करण्यात आली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहिली.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक मदत केंद्रातील पोलीस हवालदार रामपुरे, मस्कर आणि खोंदल यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक कार्यवाही केली. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.


