(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील परचुरी-वेद्रेवाडी येथील 54 वर्षीय विवाहित महिला घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.
बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव सौ. अंजनी अर्जुन वेद्रे (वय 54) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे लग्न जुळत नसल्यामुळे अंजनी वेद्रे या गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होत्या. त्याच चिंतेतून त्यांनी 26 जून 2026 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 वाजण्याच्या दरम्यान परचुरी येथील राहत्या घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडल्याचे समोर आले आहे.
घरी त्या दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचे पती अर्जुन यशवंत वेद्रे तसेच नातेवाईकांनी परिसर, गाव आणि इतर नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर अर्जुन वेद्रे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना बिनतारी संदेशाद्वारे सतर्क केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार अरुण बी. वानरे करीत आहेत.
पोलिसांचे आवाहन
सौ. अंजनी अर्जुन वेद्रे यांच्याबाबत कोणाला कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा त्या आढळून आल्यास तपासिक अंमलदार अरुण बी. वानरे (मो. 7038139499) किंवा संगमेश्वर पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी त्यांचे पती अर्जुन वेद्रे (मो. 7796103721) यांच्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

