(रत्नागिरी / प्रतिनिधी)
लाडक्या गणरायाच्या आगमनाने कोकणातील गावागावांत उत्साहाला उधाण आले असून, मुंबईसह विविध शहरांतून लाखो चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. भक्तिमय वातावरणात बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर आता गणेशोत्सवाच्या उत्तरार्धात चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाची लगबग सुरू झाली आहे. गणेश विसर्जनानंतर मुंबई, पुण्यासह अन्य शहरांकडे परतणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरळीत आणि सुखकर व्हावा, यासाठी रत्नागिरी एसटी विभागाने तब्बल २ हजार ५०० एसटी बसेसचे नियोजन केले आहे.
गणेशोत्सवासाठी यंदा मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. अवघ्या तीन दिवसांत सुमारे ३ हजार एसटी बसेसच्या माध्यमातून लाखो प्रवाशांनी रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केला. वर्षभर बंद असलेली घरांची दारे उघडली असून, गावागावांत पुन्हा चैतन्य आणि माणसांची लगबग दिसून येत आहे. गणरायाच्या आगमनाने कोकणातील वातावरण भक्तिमय झाले असले, तरी विसर्जनानंतर पुन्हा शहरांकडे परतीची तयारी सुरू होणार आहे. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रत्नागिरी विभागाने परतीच्या प्रवासासाठी अडीच हजार एसटी बसेस सज्ज ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे, एसटी महामंडळाने सुमारे २० दिवसांपूर्वीच या विशेष बसेसचे आरक्षण खुले केले होते. त्याला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत तब्बल २ हजार बसेसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये तब्बल ८०० बसेसचे ग्रुप बुकिंग झाले आहे.
गणेश विसर्जनानंतर रत्नागिरी विभागातून या बसेस मुंबईच्या दिशेने तसेच पुणे व अन्य प्रमुख शहरांकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी तिकीट मिळविण्यासाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी प्रवाशांनी आताच आरक्षण करण्याचे आवाहन एसटी विभागाने केले आहे. परतीच्या प्रवासासाठी नियोजित अडीच हजार बसेसपैकी दोन हजार बसेस आधीच आरक्षित झाल्याने आता मोजक्याच बसेस उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्या गणेशभक्तांनी अद्याप परतीचे तिकीट आरक्षित केलेले नाही, त्यांनी विलंब न करता ऑनलाइन तिकीट बुकिंग करून आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वे, खासगी वाहतूक आणि एसटीवर मोठा ताण येतो. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाने केलेले विशेष नियोजन चाकरमान्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. गणरायाला निरोप दिल्यानंतर परतीच्या प्रवासात गर्दीचा सामना करण्याऐवजी आगाऊ आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करणेच अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर ठरणार आहे.


