(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर वाहने अस्ताव्यस्तपणे उभी करून वाहतुकीला तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांविरोधात रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विविध ठिकाणी रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहने उभी केल्याप्रकरणी चार वाहनधारकांविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१२ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनांची नोंद १३ सप्टेंबर रोजी करण्यात आली. मारुती मंदिर ते उद्यमनगर मार्गावरील चिंतामणी स्टेशनरी दुकानासमोर पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप (एमएच ०८ डब्ल्यू ५०४६) रस्त्याच्या मध्यभागी धोकादायक पद्धतीने उभी करण्यात आली होती. याप्रकरणी साईश प्रमोद वाडकर (वय २६, रा. वाडकरवाडी, शिरगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याच मार्गावरील क्वालिटी बेकरीसमोर काळ्या रंगाची अल्काझार कार (केए ६५ एम क्रमांक) वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी करण्यात आली होती. याप्रकरणी प्रथमेश संदीप चव्हाण (वय ३४, रा. शिरगाव) यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली.
दरम्यान, एस.टी. स्टँड ते आठवडा बाजार मार्गावरही अशाच प्रकारे रस्त्यावर वाहने उभी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी मारुती सुझुकी सुपर कॅरी (एमएच ०८ एपी ३५८१) उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी महांतय्या रेवणसिद्धय्या मठ (वय ५२, रा. मिरजोळे, रत्नागिरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. याच मार्गावर महिंद्रा सुपर प्रॉफिट मिनी ट्रक (एमएच ४६ बीयू ६८५२) वाहतुकीस धोका निर्माण होईल अशा पद्धतीने उभा केल्याप्रकरणी दर्शन दिलीप खाकरोडे (वय २८, रा. कोकणनगर, कीर्तीनगर, रत्नागिरी) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल वैभव नार्वेकर यांनी तक्रार दिली.
रस्ते हे पार्किंगसाठी नव्हे, तर सुरक्षित वाहतुकीसाठी असतात. शहरातील वाढती वाहतूक, अरुंद रस्ते आणि पादचाऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता, सार्वजनिक मार्गांवर बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी रस्त्याच्या मध्यभागी अथवा वाहतुकीला अडथळा ठरेल अशा ठिकाणी वाहने उभी न करता अधिकृत पार्किंगचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


