(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी गावची कन्या आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेली सिद्धी वैभव दाभोळकर हिने पोलीस भरतीत यश संपादन करत मीरा-भाईंदर पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड मिळवली आहे. तिच्या या यशामुळे डिंगणी गावासह संपूर्ण परिसरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शिक्षण आणि करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असतानाही सिद्धीने समाजसेवेची वाट निवडत ‘खाकी’ वर्दीचे स्वप्न पूर्ण केले. पदवी शिक्षण पूर्ण करून आरामदायी नोकरीची संधी असतानाही तिने कठोर परिश्रम, सराव आणि जिद्दीच्या जोरावर पोलीस भरतीची परीक्षा यशस्वीपणे पार केली.
सिद्धीने मुंबईतील परळ येथील सोशल सर्विस लीग तसेच गिरगाव येथील भारतीय विद्या भवन महाविद्यालयातून शिक्षण घेतले. तिने बी.कॉम. पदवीसह जी.डी.सी.ए. शिक्षणही पूर्ण केले आहे. अभ्यासात सातत्य राखत तिने पोलीस भरतीसाठी मेहनत घेतली आणि अखेर यश संपादन केले.
तिचे वडील वैभव दत्ताराम दाभोळकर हे मुंबईत खासगी वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबासाठी कठोर मेहनत घेत मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले. त्यांच्या कष्टाला आज सिद्धीच्या यशामुळे मोठे फळ मिळाले आहे.
सिद्धी आपल्या मूळ गावी डिंगणीत पोहोचताच ग्रामस्थांनी तिचे उत्साहात स्वागत केले. मुंबईत राहूनही गावाशी असलेली नाळ जपणाऱ्या या लेकीचा गावकऱ्यांना अभिमान वाटत आहे. तिच्या यशामुळे परिसरातील तरुणींनाही प्रेरणा मिळत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड झाल्यानंतरही सिद्धीची वाटचाल थांबलेली नाही. भविष्यात पोलीस दलात उच्च अधिकारी पद मिळवण्याचे ध्येय असल्याचे तिने सांगितले. तिच्या जिद्दीमुळे डिंगणीच्या या कन्येची यशस्वी वाटचाल आगामी काळात आणखी उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

