(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील शिरबांडवाडी (ओझर) परिसरातील पाण्याच्या खोल डोहात बुडून ४० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (३० जुलै) दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राजेश दिनकर किर (वय ४०, रा. रनपार, किरवठार, ता. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी मृताचे चुलत भाऊ नितीन पुरुषोत्तम किर यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या वाडीतील जयवंत किर यांनी घरी येऊन राजेश किर हे शिरबांडवाडी येथील ओझर परिसरातील पाण्याच्या डोहात बुडाल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच नितीन किर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी ग्रामस्थ दोरी व काठ्यांच्या सहाय्याने राजेश किर यांना डोहातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करत होते. मात्र, डोहातील पाणी खोल असल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या.
अखेर फिनोलेक्स कंपनीच्या फायर फायटर विभागाचे अनिल सुर्वे यांनी बोया, दोरी आणि गळ यांच्या साहाय्याने सायंकाळी पाचच्या सुमारास राजेश किर यांना डोहातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

