(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओ संदेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना आणि तरुणांना संयम, संवाद आणि सकारात्मकतेचा संदेश दिला. “मला त्या विद्यार्थ्यांना माफ करायचे आहे. त्यांना शिक्षा नव्हे, तर योग्य मार्गदर्शनाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरोधात आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दलही आक्षेपार्ह भाषा वापरली. या घटनेचा उल्लेख करत त्यांनी ती भाषा कोणत्याही सुसंस्कृत समाजाला शोभणारी नसल्याचे म्हटले. या व्हिडिओमध्ये त्यांनी विद्यार्थी, तरुण यांच्याशी संवाद साधत परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
‘लहानपणी चुका होतात, सुधारण्याची संधीही द्यावी’
व्हिडिओमध्ये मोदी म्हणाले, “लहानपणी चुका होतात आणि त्या सुधारण्याची संधीही असते. समाजात याबाबत संताप असणे स्वाभाविक आहे, पण भरकटलेल्या तरुणांना योग्य दिशा दाखवणे हेच आपले कर्तव्य आहे.” विद्यार्थ्यांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवून किंवा समाजातून दूर ठेवून परिस्थिती बदलणार नाही, या मुलांना जवळ घेऊन योग्य मार्ग दाखवण्याची हीच वेळ आहे. ही दिशाभूल झालेली मुलं आहेत आणि त्यांना योग्य दिशा दाखवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांना शिक्षा देणं, न्यायालयांच्या फेऱ्या मारायला लावणं किंवा समाजात त्यांचा छळ करणं, यामुळे परिस्थिती बदलणार नाही. मी त्यांना माफ करू इच्छितो. समाजानेही माझी ही भूमिका स्वीकारावी, अशी माझी विनंती आहे.
‘मला त्यांना माफ करायचे आहे’
पंतप्रधान म्हणाले, “मला त्या मुलांना माफ करायचे आहे. समाजानेही मोठ्या मनाने हा दृष्टिकोन स्वीकारावा. कधी कधी दातांमध्ये जीभ चावली जाते आणि रक्त येते, पण त्यासाठी आपण दात तोडत नाही. कारण दातही आपलेच असतात आणि जीभही आपलीच असते. ही मुलेही आपलीच आहेत.” त्यांनी भरकटलेल्या तरुणांना शिक्षा करण्याऐवजी त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
‘देशासाठी एकत्र काम करूया’
आपल्या संदेशात मोदी यांनी तरुणांना सकारात्मक विचार करण्याचे आवाहन करत, “चुकांमधून शिका, नवीन गोष्टी शिका आणि आपल्या स्वप्नांसह पुढे चला. देश वेगाने प्रगती करत आहे आणि तुमची प्रगतीही त्याच्याशी जोडलेली आहे. मी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करतो. चला, आपण सर्वांनी मिळून भारतासाठी काम करूया,” असे म्हटले.
‘शिवीगाळ करून काहीही साध्य होत नाही’
भाषणाच्या शेवटी पंतप्रधान मोदी यांनी “शिवीगाळ करून कधीही कोणतेही उद्दिष्ट साध्य होत नाही. संवाद, संयम आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातूनच समाज आणि देश पुढे जातो,” असा संदेश देत तरुणांना देशाच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन केले.

