(नवी दिल्ली)
भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच एक अत्याधुनिक शस्त्र सामील होणार आहे. पाण्याखालील भूसुरुंगांचा शोध घेऊन त्यांना काही सेकंदांत निष्क्रिय करण्याची क्षमता असलेले हे अत्याधुनिक अंडरवॉटर वाहन भारतीय सागरी सुरक्षेला मोठी ताकद देणार आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) विकसित करत असलेले हे आधुनिक तंत्रज्ञान समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या गुप्त हालचालींवर अधिक कडक नजर ठेवण्यास मदत करणार आहे.
विशेष म्हणजे, ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सातत्याने आपली सागरी संरक्षण क्षमता वाढवत आहे. याच धर्तीवर DRDOने ‘नवे ब्रह्मास्त्र’ म्हणून ओळखला जाणारा मॅन-पोर्टेबल ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकल (MP-AUV) विकसित केला आहे. हे वाहन पाण्याखाली भूसुरुंगांसारख्या धोकादायक वस्तू रिअल टाइममध्ये ओळखून त्वरित निष्क्रिय करू शकते.
या AUVमध्ये बसवण्यात आलेले साइड-स्कॅन सोनार, उच्च-रेझोल्यूशन कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणाली शत्रूच्या खाणी काही क्षणांत ओळखून त्यांचे अचूक ठिकाण निश्चित करतात. समुद्रात मिळणारे तपशीलवार प्रतिमान (डिटेल स्कॅन) शत्रूच्या कोणत्याही प्रकारच्या मायन-किंवा स्फोटक यंत्रणांना ओळखण्यास सक्षम आहेत.
हे संपूर्ण तंत्रज्ञान विशाखापट्टणम येथील DRDOच्या नौदल विज्ञान व तंत्रज्ञान प्रयोगशाळेने (NSTL) विकसित केले आहे. भारतीय नौदलाच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेले हे MP-AUV सध्या फील्ड ट्रायल्समध्ये यशस्वी ठरले असून लवकरच त्याचे उत्पादन सुरु होणार आहे. नौदलाच्या सागरी मोहिमांमध्ये हे वाहन खाण निर्मूलनासाठी मोठी क्रांती घडवेल, असा DRDOचा दावा आहे.
या अत्याधुनिक प्रणालीमुळे समुद्रातील शत्रूच्या कोणत्याही हालचालींवर आता भारतीय नौदलाची ‘करडी नजर’ राहणार आहे.

