(चिपळूण / वार्ताहर)
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुरुचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले. “प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिली गुरु ही त्याची आई असते. त्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर विविध गुरु मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. पालक आणि शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांमुळेच व्यक्तिमत्त्व घडते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालकांइतकाच शिक्षकांचाही मोलाचा वाटा असतो,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य प्रा. सूर्यवंशी, दोन्ही महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरु-शिष्य नात्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

