(संगमेश्वर / वार्ताहर)
शृंगारपूर गावातील श्री. मनेश म्हस्के यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवाच्या सजावटीतून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा प्रेरणादायी संदेश दिला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून करण्यात आलेल्या साध्या, सुंदर आणि आकर्षक सजावटीतून प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मागील अनेक वर्षांपासून श्री. मनेश म्हस्के यांच्या घरी शाडू मातीची गणेशमूर्ती आणून गणरायाची भक्तिभावाने पूजा केली जाते. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी सजावट करताना केळीची पाने, आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. गावामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून ही सजावट करण्यात आली असून, त्यातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या सजावटीत प्लास्टिकचा वापर टाळून त्याऐवजी नैसर्गिक वस्तूंचा वापर करता येतो, हे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या बदलाची आवश्यकता नसून, छोट्या-छोट्या चांगल्या सवयींची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केल्यास त्याचा व्यापक परिणाम होऊ शकतो, असा संदेश या सजावटीतून देण्यात आला आहे.
संगमरत्न फाऊंडेशनच्या माध्यमातून मागील अठरा महिन्यांपासून श्री प्रचितगड किल्ला संवर्धनाचे कार्य सुरू आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शृंगारपूरमध्ये येणाऱ्या स्थानिक नागरिकांसह चाकरमानी बांधवांपर्यंत गड संवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बदलाची सुरुवात स्वतःपासून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील वर्षापासून शाडू मातीची गणेशमूर्ती आणणे, गणेशोत्सवाच्या सजावटीत प्लास्टिकचा वापर टाळणे, प्लास्टिकऐवजी नैसर्गिक व पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करणे तसेच गावात सहज उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीपासून सजावट करणे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केल्यास समाजातही सकारात्मक बदल घडू शकतो, हा विचार या उपक्रमातून मांडण्यात आला आहे.


