(नवी मुंबई)
नवी मुंबईतील अटल सेतूवरून समुद्रात उडी मारलेल्या 28 वर्षीय तरुणाचा अद्याप शोध लागलेला नाही. या घटनेनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रतिक सुभाष रासकर (वय 28) हा मूळचा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी आहे. तो शेअर मार्केट संबंधित क्लासेसशी जोडलेला काम करत होता.
घटना 7 जून रोजी मध्यरात्री 1 वाजून 29 मिनिटांच्या सुमारास घडली. प्रतिक घरातून बाहेर पडताना कुटुंबीयांना “जेवणासाठी बाहेर जात आहे” असे सांगून निघाला होता. त्यानंतर तो कारने अटल सेतूवर आला. अटल सेतूवर पोहोचल्यावर त्याने कार थांबवून थेट समुद्रात उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र, दिवसभराच्या प्रयत्नांनंतरही त्याचा मृतदेह हाती लागलेला नाही. पोलिसांनी प्रतिकचे वर्णन जाहीर केले आहे. तो गोरा वर्ण, सुमारे 5 फूट 10 इंच उंच, मजबूत शरीरयष्टीचा असून त्याचे केस काळे आणि थोडी दाढी-मिशी वाढलेली आहे. घटनेवेळी त्याने पांढरा शर्ट आणि ग्रे रंगाची पँट घातली होती. त्याला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.
या प्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर क्रमांक 48/2026 अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असून, प्रतिक रासकर याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ उलवे पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे.

