(राजापूर/ तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करणे हे केवळ प्रशासकीय सोयीचे नव्हे, तर जनहिताच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरेल. रायापाटणऐवजी पाचलची निवड केल्यास तालुक्यातील हजारो नागरिकांना महसूलविषयक सेवा अधिक सुलभ आणि जलद मिळू शकतील, अशी मागणी युवा उद्योजक विक्रांत सागरे यांनी शासनाकडे केली आहे.
सागरे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पाचल हे परिसरातील अनेक गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण असून येथील दळणवळण व्यवस्था रायापाटणच्या तुलनेत अधिक विकसित आहे. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात पोहोचणे सोयीचे ठरेल आणि वेळ तसेच प्रवासाचा खर्चही वाचेल.
पाचल परिसरातील लोकसंख्येची घनता लक्षात घेता महसूल विभागाच्या सेवांची गरज अधिक आहे. अप्पर तहसीलदार कार्यालय येथे सुरू झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना दाखले, सातबारा दुरुस्ती, महसूलविषयक विविध कामे आणि इतर प्रशासकीय सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होतील.
याशिवाय पाचल येथे वीज, इंटरनेट आणि कार्यालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने कार्यालयाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. या भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना राजापूर किंवा इतर ठिकाणी वारंवार प्रवास करण्याची गरज भासणार नाही.
प्रशासकीय दृष्टिकोनातूनही पाचल हे ठिकाण अधिक योग्य असल्याचे सागरे यांनी नमूद केले आहे. येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू झाल्यास राजापूर तहसील कार्यालयावरील कामाचा ताण कमी होऊन नागरिकांची कामे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे मार्गी लागतील.
वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून रायापाटणऐवजी पाचल येथेच अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर करावे, अशी मागणी युवा उद्योजक विक्रांत सागरे यांनी शासनाकडे केली आहे.

