(राजापूर / तुषार पाचलकर)
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राजापूर विधानसभा मतदारसंघातील तळवडे जिल्हा परिषद विभागात शिवसेनेच्या वतीने गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. महिला उपजिल्हा संघटिका तथा चंद्रपूर जिल्हा संपर्क संघटिका सौ. उल्का विश्वासराव आणि राजापूर पूर्व विभाग संपर्कप्रमुख सौ. समीक्षा सक्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दौरा पार पडला.
या दौऱ्यादरम्यान झर्ये, येरडव, कारवली, पाचल, तळवडे, सावडाव, हातदे, अजिवली, जवळेथर, मिळंद आणि मूर या गावांना भेटी देण्यात आल्या. यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेबाबतही माहिती घेऊन त्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
गावभेटीदरम्यान पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, आगामी काळातील पक्षाच्या उपक्रमांमध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे, याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी तळवडे विभागप्रमुख विलास नारकर, विभाग संघटिका भामिनी सुतार, विभाग समन्वयक अनंत कोलते, उपविभागप्रमुख अप्पा चव्हाण यांच्यासह विविध गावांतील प्रमुख पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाखाप्रमुख, बीएलए आणि शाखा संघटिका उपस्थित होत्या.
गावागावांत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यात आल्याने या दौऱ्याला स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळाला.

