( मंडणगड /वार्ताहर )
प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे येथे शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी स्त्री परिचर श्रीमती दिप्ती दिपक किर आणि आरोग्य सहाय्यक (पुरुष) श्री राम देवजी रेंगडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भावपूर्ण सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, मंडणगड तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पणदेरी, कुंबळे आणि देव्हारे येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्रीमती दिप्ती किर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे येथे तब्बल ४० वर्षे ८ महिने अखंड सेवा बजावल्याबद्दल, तर श्री राम रेंगडे यांनी ३१ वर्षे आरोग्य विभागात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. दोघांनीही आपल्या सेवाकाळात रुग्णसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पित कार्यातून आरोग्य विभागात वेगळी ओळख निर्माण केली.
समारंभाचे विशेष आकर्षण म्हणजे सेवानिवृत्त होणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या जीवनप्रवासावर आधारित तयार करण्यात आलेली लघुपट (शॉर्ट फिल्म) होय. या चित्रफितीत त्यांच्या सेवाकाळातील संस्मरणीय क्षण, आरोग्य क्षेत्रातील योगदान आणि कार्याचा आढावा उपस्थितांसमोर सादर करण्यात आला. या अनोख्या उपक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी वैद्यकीय अधिकारी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. त्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रीमती दिप्ती किर आणि श्री राम रेंगडे यांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

