(मुंबई)
महाराष्ट्रातील वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यंदा अधिक भव्य स्वरूपात आणि ‘राज्य महोत्सवा’च्या रूपात साजरा होणार असून, त्यासाठी राज्य शासनाने सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली.
शासनाचा उत्सवात थेट सहभाग
आशिष शेलार म्हणाले, “गणेशोत्सवाची महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात आणि जगभरात मोठी ओळख आहे. याच परंपरेचा सन्मान राखत आणि ती पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा देण्यात आला आहे.”
शेलार यांनी पुढे सांगितले की, “गणेशोत्सव काळात धार्मिक परंपरा, सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांना पुरस्कार दिले जातील. गिरगाव चौपाटीवर भव्य ड्रोन शो होणार असून, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह सर्व जिल्ह्यांमध्ये रोषणाई, सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.”
घरबसल्या गणरायाचे दर्शन
राज्यातील महत्त्वाची मंदिरे व सार्वजनिक गणेशोत्सवांचे देखावे घरबसल्या पाहता यावेत यासाठी विशेष डिजिटल पोर्टल तयार करण्यात येणार आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवांचे फोटो, व्हिडिओ, क्लिप्स यासाठीही एक प्लॅटफॉर्म विकसित केला जाईल.
- पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड
- भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी थेट अनुदान देण्यात येणार आहे.
- राज्यस्तरीय भजन स्पर्धांचे आयोजन केले जाईल.
- गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट व विशेष नाणे जारी केले जाईल.
- गणपती विषयक परंपरा, कला, संस्कृती दर्शवणाऱ्या चित्रपटांचा विशेष गौरव केला जाईल.
या उपक्रमांचा समावेश
राज्य सरकारच्या सहभागातून यावर्षी गणेशोत्सवात खालील उपक्रम राबवले जाणार आहेत :
- सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम
- राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
- व्याख्यानमाला आणि अध्यात्म-नाट्यरंग महोत्सव
- परदेशातील मराठी भाषिक देशांमध्येही कार्यक्रम
प्रदर्शन आणि स्पर्धा
उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा (तालुका ते राज्य स्तरावर)
- घरगुती गणेश आरास स्पर्धा
- गणपतीविषयक reels स्पर्धा राज्यभरातून
- राज्य महोत्सवासाठी विशेष लोगोचे अनावरण
डिजिटल आणि पर्यटन सुलभता
- डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे गणेशदर्शन
- पर्यटकांसाठी विसर्जन सोहळ्यात विशेष सुविधा व वाहतूक व्यवस्था
- परदेशी विद्यार्थी आणि आंतरराज्यीय पर्यटकांसाठी सहभाग योजनांची आखणी
सुशोभीकरण आणि रोषणाई
- सार्वजनिक ठिकाणी विद्युत रोषणाई आणि सजावट
- गिरगाव चौपाटीवर ड्रोन शोचे आयोजन
प्रचार व प्रसिद्धी
- राज्य महोत्सवाची माहिती देशभर पोहोचवण्यासाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियामार्फत प्रचार
- मराठी बांधव मोठ्या संख्येने असलेल्या राज्यांमध्ये विशेष कार्यक्रम
या उपक्रमामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, कला आणि अध्यात्मिकता अधिक व्यापक प्रमाणात साजरी होणार असून, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

