(रत्नागिरी /प्रतिनिधी)
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर लागू असलेले तात्पुरते निर्बंध तातडीने शिथिल करून गॅसचा नियमित पुरवठा पूर्ववत करावा, तसेच नवीन घरगुती एलपीजी जोडण्यांना तत्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांनुसार ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी दोन रिफिल सिलेंडरमधील किमान कालावधी ४५ दिवसांचा निश्चित करण्यात आला असून, नवीन घरगुती एलपीजी जोडण्यांनाही तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार जठार यांनी निदर्शनास आणून दिले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने कोकणातील नागरिकांनी पारंपरिक लाकूड इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर कमी करून एलपीजीचा स्वीकार केला आहे. ग्रामीण भागात संयुक्त कुटुंबपद्धती प्रचलित असल्याने अनेक घरांमध्ये सदस्यसंख्या अधिक आहे. त्यामुळे एकाच सिलेंडरवर सलग ४५ दिवसांचा स्वयंपाकाचा खर्च भागविणे अनेक कुटुंबांसाठी व्यवहार्य राहत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोकणातील होळी आणि विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमध्ये वास्तव्यास असलेले हजारो चाकरमानी गावी परतत असल्याने घरगुती गॅसची मागणी लक्षणीय वाढते. गणेशोत्सवात नवीन एलपीजी जोडण्या आणि अतिरिक्त रिफिल सिलेंडरची गरज मोठ्या प्रमाणावर भासते. अशा परिस्थितीत विद्यमान निर्बंध कायम राहिल्यास नागरिकांना गंभीर गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामीण ग्राहकांसाठी दोन रिफिल सिलेंडरमधील ४५ दिवसांचा कालावधी पूर्ववत करून तो किमान २५ दिवसांपर्यंत कमी करण्यात यावा, तसेच सर्व अधिकृत एलपीजी वितरकांना नवीन घरगुती गॅस जोडण्या देण्यास तातडीने परवानगी द्यावी, अशी ठोस मागणी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.
यासंदर्भात पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच संबंधित तेल विपणन कंपन्यांशी समन्वय साधून रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांना तातडीने दिलासा मिळेल, अशी प्रभावी कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

