(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथे पोटापाण्यासाठी जंगलतोडीचे काम करणारी एक आदिवासी महिला गंभीररीत्या भाजली असून तिच्या शरीराचा सुमारे 80 टक्के भाग जळाला आहे. ही घटना रविवार, 27 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
चाफवली परिसरात सुर्वे नामक व्यक्तीकडे जंगलतोडीचे काम सुरू असून, संबंधित महिला त्याठिकाणी काम करत होती. कामाच्या ठिकाणी वास्तव्यासाठी उभारलेल्या झोपडीतच ती भाजल्याचे समोर आले आहे. मात्र महिला नेमकी कशामुळे भाजली, याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही.
घटना जंगल भागात घडल्याने आणि परिसरात तातडीची मदत उपलब्ध नसल्यामुळे सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही महिला उपचाराविना तडफडत होती. अखेर कुटुंबीय कसाबसा होळीच्या मांडावर आले आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. हा आवाज ऐकून चाफवलीचे पोलीस पाटील विजय चाळके यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेतली.
यानंतर त्यांनी त्वरित 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र साखरपा व देवरुख येथे ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याचे समजले. त्यानंतर पोलीस पाटील विजय चाळके यांनी युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद अपंडकर यांच्याशी संपर्क साधला. आमदार भैय्या सामंत यांनी देवळे येथे उपलब्ध करून दिलेल्या ॲम्बुलन्सद्वारे तातडीने महिलेला साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
यावेळी विभागप्रमुख राजू कामेरकर, अंकुश सुर्वे, ओंकार कोलते, प्रणित बेटकर हे साखरपा येथे उपस्थित होते. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी सदर महिलेला आमदार भैय्या सामंत यांच्या ॲम्बुलन्सने पाली येथे हलवण्यात आले. त्यानंतर पाली येथून शासकीय ॲम्बुलन्सद्वारे तिला रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे.
या घटनेमुळे जंगल भागातील कामगारांच्या सुरक्षिततेचा आणि आपत्कालीन आरोग्य सेवांच्या उपलब्धतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

