(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पत्रकार संतोष पोटफोडे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत काही महत्त्वाची माहिती मागवली होती. मात्र तब्बल ३५ दिवस उलटूनही संबंधित माहिती देण्यात आली नव्हती. याबाबत “रत्नागिरी 24 न्यूज”ने वृत्त प्रसिद्ध करताच आरोग्य प्रशासनाला जाग आली आणि दुसऱ्याच दिवशी मागितलेली माहिती उपलब्ध करून देण्यात आली.
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीत अनेक धक्कादायक आणि महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्राचा बाह्यरुग्ण विभाग सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० आणि सायंकाळी ४ ते ६ वा. किंवा रुग्ण संपेपर्यंत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांनी या वेळांची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच सोमवार पूर्ण दिवस, रविवार अर्धा दिवस आणि शनिवार दुपारनंतर बाह्यरुग्ण विभाग बंद राहण्याबाबत शासन निर्णयाची प्रत आरोग्य केंद्राकडे उपलब्ध नसल्याचेही उघड झाले. मात्र आयुक्त कार्यालयाचे पत्र उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सुट्टीच्या दिवशीही सर्व रुग्णांची तपासणी व उपचार केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी सुट्टीचे कारण सांगून अनेक रुग्णांना परत पाठवले जात असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र माहिती अधिकारातून ही बाब स्पष्ट झाल्याने आता सुट्टीच्या दिवशीही रुग्णांना उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
माहितीनुसार, दुपारी १ ते ४ या वेळेत रुग्णालयात योगा क्लासेस व विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. तसेच समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी दुपारच्या वेळेत फिरतीवर राहणे अपेक्षित असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. डॉक्टरांनी सकाळी साडेआठ वाजता उपस्थित राहणे बंधनकारक असल्याची माहितीही समोर आली आहे.
साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राला आठवड्याची सुट्टी लागू नसल्याचे तत्कालीन आमदार राजन साळवी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी रायभोळे यांच्या उपस्थितीत स्पष्ट केले होते आणि त्यास तत्कालीन अधिकाऱ्यांनीही मान्यता दिली होती, असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत भव्य असली तरी येथे तज्ज्ञ आणि एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्णांना अन्य ठिकाणी जावे लागत आहे. अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या शवविच्छेदनासाठी दुसऱ्या आरोग्य केंद्रातील एमबीबीएस डॉक्टरांची वाट पाहावी लागते. त्यामुळे मृत्यूनंतरही मृतदेहाची कुचंबणा होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
ही गंभीर समस्या तातडीने सोडवून साखरपा आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी पत्रकार संतोष पोटफोडे यांनी आरोग्यमंत्री आणि आरोग्य आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान, “रत्नागिरी 24 न्यूज”ने हा विषय लावून धरल्याबद्दल साखरपा पंचक्रोशीतील नागरिकांनी पत्रकार संतोष पोटफोडे आणि वृत्तवाहिनीचे आभार मानले आहेत.

