(देवळे / प्रकाश चाळके)
कोकणातील प्रमुख नगदी फळपिके असलेल्या आंबा आणि काजू पिकांवरील मोहोर संरक्षण व व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. वैभव शिंदे, सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला हे देवरुख येथे येणार आहेत. हे विशेष चर्चासत्र सोमवार, दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता पंचायत समिती देवरुख येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
सकाळच्या सत्रात आंबा मोहोर संरक्षण व व्यवस्थापन तर दुपारच्या सत्रात काजू मोहोर संरक्षण व व्यवस्थापन यावर डॉ. शिंदे यांचे सविस्तर मार्गदर्शन होईल. दोन्ही सत्रांनंतर प्रश्नोत्तरे व शेतकऱ्यांशी मुक्त चर्चा आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम पूर्ण दिवस चालणार असून, उपस्थितांनी स्वतःचे पिण्याचे पाणी व दुपारचे जेवण सोबत आणावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या चर्चासत्राचे आयोजक संगमेश्वर नैसर्गिक शेती गट व संगमेश्वर तालुका ऍग्रोस्टार फार्मफ्रेश शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) आहेत. या निमित्ताने संगमेश्वर नैसर्गिक शेती गट प्रमुख हेमंत तांबे आणि ऍग्रोस्टार फार्मफ्रेश चेअरमन विलास शेलार यांनी तालुक्यातील जास्तीत जास्त आंबा व काजू शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

