(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा संपताच सर्वत्र उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरणाची लहर पसरली आहे. गणेशोत्सवानिमित्त घराघरांत पाहुण्यांची वर्दळ वाढल्याने बाजारपेठेतील भाजीपाला आणि फळांच्या मागणीलाही चांगलीच उधाण आले आहे. स्थानिक तसेच गावठी भाज्यांची आवक वाढली असली तरी मागणीच्या तुलनेत दरही चढले असून, सणासुदीच्या काळात गृहिणींच्या स्वयंपाकघराचे अर्थकारण काहीसे बिघडले आहे.
गणेशोत्सवात अनेक घरांमध्ये धार्मिक कार्यक्रम, उपवास आणि विविध पूजाविधी होत असल्याने शाकाहारी पदार्थांना विशेष महत्त्व असते. त्यातच ऋषीपंचमी आणि गौरीपूजनासाठी विविध प्रकारच्या भाज्यांची पारंपरिक भाजी केली जात असल्याने बाजारात भाजीपाल्याची खरेदी वाढली आहे. दोडका, पडवळ, भोपळा, लाल माठ, भेंडी, वांगी, कोबी, मेथी, फ्लॉवर आणि गाजर यांसारख्या भाज्यांना विशेष मागणी आहे. बहुतांश भाज्या सध्या ३० ते ४० रुपये पाव किलो दराने विकल्या जात असल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आणि गावठी भाज्यांना ग्राहकांकडून विशेष पसंती मिळत आहे. भेंडी, पडवळ, दोडका, दुधी भोपळा, लाल भोपळा तसेच काकडीची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पालेभाज्यांमध्ये लाल माठ, मेथी आणि पालक यांनाही मागणी आहे. सणाच्या दिवसांत ताज्या आणि स्थानिक भाज्यांना असलेली पसंती लक्षात घेता त्यांच्या दरातही वाढ झाली आहे.
बाजारात हंगामापूर्वीच मटार, पावटा आणि भुईमूगाच्या शेंगांची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे या भाज्यांचे दरही तुलनेने अधिक आहेत. मटारची विक्री सध्या १८० ते २०० रुपये किलो दराने होत आहे. ओल्या भुईमूगाच्या शेंगा सुमारे ४० रुपये पाव किलो, तर पावट्याच्या शेंगा ३० रुपये पाव किलो दराने विकल्या जात आहेत. हंगामापूर्वीच या भाज्या बाजारात दाखल झाल्याने त्यांच्या दरात तेजी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मका कणीसही बाजारात दाखल झाले असून त्याची विक्री १५ ते २० रुपये नग दराने सुरू आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नैवेद्यासाठी विविध फळांसोबत काकडी, तवसे आणि चिबूडालाही मागणी वाढली आहे.
गणेशोत्सवाचा उत्साह वाढत असतानाच बाजारातील भाजीपाला आणि फळांची मागणीही कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः गौरीपूजनापर्यंत खरेदीचा जोर कायम राहणार असल्याने दरांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे घराघरांत गणरायाच्या आगमनाचा आनंदोत्सव रंगला असताना, दुसरीकडे वाढत्या भाजीपाल्याच्या दरामुळे सणासुदीच्या खरेदीचा भार मात्र ग्राहकांच्या खिशावर अधिक जाणवणार आहे.
कांदा सत्तरीच्या उंबरठ्यावर
गणेशोत्सवासाठी घरोघरी पाहुण्यांची वर्दळ वाढल्याने स्वयंपाकासाठी कांद्याची मागणीही वाढली आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात कांद्याच्या दराने उसळी घेतली असून तो सध्या ६० ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या भाजीपाल्याच्या दरात कांद्याची भर पडल्याने घरगुती स्वयंपाकाचे बजेट आणखी ताणले गेले आहे.


