(चिपळूण / वार्ताहर)
चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरातील अल नजु अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ८ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी (३० जुलै) दुपारी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नगमा अबीदअली मुजावर (वय ४०, रा. गोवळकोट रोड, चिपळूण) या ३० जुलै रोजी दुपारी १२.३० ते १.४० या कालावधीत घराबाहेर गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा हत्याराच्या साहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे अडीच तोळे वजनाचे तीन सरींचे सोन्याचे मंगळसूत्र, एक तोळे वजनाचे आणखी एक सोन्याचे मंगळसूत्र, एकूण तीन तोळे वजनाच्या पाच सोन्याच्या चेन, एक तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, दोन तोळे वजनाच्या चार जोड सोन्याच्या कर्णफुल्या, तसेच सुमारे चार तोळे वजनाच्या दहा सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश आहे. याशिवाय घरातील ८ हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्याने लंपास केली. चोरीस गेलेल्या सर्व ऐवजाची एकूण किंमत सुमारे ८ लाख १८ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, याच कालावधीत चिपळूण शहरातील बायपास रोडवरील द्वारका कृष्णकुंज इमारतीतील धनश्री भोसले यांच्या राहत्या घरातही चोरी झाल्याची माहिती फिर्यादीला मिळाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. त्यामुळे या दोन्ही घरफोड्यांमध्ये एकाच टोळीचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३०५(अ) व ३३१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

