(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील प्रख्यात कला शिक्षक शाम पवार यांना साऊ, ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा देशपातळीवर प्रचार व प्रसार करीत असलेल्या महाराष्ट्रातील नामांकित संस्थेने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार २०२५ देऊन त्यांचा गौरव केला आहे. सदर पुरस्काराचे वितरण इतिहास संशोधन मंडळ पुणे येथील वी. का. राजवाडे सभागृहात दिनांक २४ ऑगस्ट रोजी एका शानदार समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कला अध्यापक शाम पवार हे गेली अनेक वर्षे मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मालगुंड मध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शासकीय रेखकाला परीक्षा त्यामध्ये एलिमेंटरी व इंटरमिजीएट या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करतात. तसेच विद्यार्थ्यांना चित्रकला विषय अगदी सहज व सोप्या पद्धतीने शिकवतात. त्यांचे अनेक विद्यार्थी आता उच्च पदावर कला शिक्षक तसेच रांगोळीकर म्हणून नावलौकिक करीत आहेत. चित्रकला विषय विद्यार्थ्यांना आवडीने शिकवण्यात त्यांचा हातखंडा आहे, अतिशय मितभाषी असलेले हे शाम पवार आपल्या कलेने ते लहान थोर मंडळींच्या मनावर अधिराज्य गाजवित आहेत. शाम पवार हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जसे कार्यरत आहेत, तसे ते सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये देखील आपला ठसा उमटवत आहेत.
शाम पवार हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक व धार्मिक क्षेत्रामध्ये सक्रिय सहभागी असतात म्हणूनच त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यपातळीवरील प्रतिष्ठेचा भारत भूषण पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे, मुख्य आयोजक विकास उबाळे, पोलिस सब इन्स्पेक्टर विष्णू देशमुख, अभिनेत्री चित्रा दीक्षित, ॲड नीता शेळके वकील उच्च न्यायालय नागपूर, आम्रपाली पारवे व्याख्याते, प्रबोधनकार, सचिन देवरे व्याख्याते प्रबोधनकार, केतकी गावडे अभिनेत्री, हिमांशु जैन सुवर्ण पदक विजेते, डॉ विद्याश्री यमचे लावणी कलावंत, भक्ती साधू अभिनेत्री, पूजा माळी लावणी कलावंत असे प्रमुख मान्यवर या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते.
शाम पवार यांना या अगोदर राज्यस्तरीय आदर्श कला अध्यापक पुरस्कार २०२४, महाराष्ट्र पत्रकार संघ पूणे यांचे मार्फत शिक्षक रत्न पुरस्कार २००४, राज्यस्तरीय कला गौरव महोत्सव शिक्षक भूषण पुरस्कार २०१०, महाराष्ट्र पत्रकार संघ पूणे मार्फत आदर्श कला भूषण पुरस्कार २०१२, रत्नागिरी जिल्हा कला अध्यापक संघ उपक्रमशील शिक्षक २०१९, विश्व समता कला मंच लोवले रत्नागिरी यांच्या मार्फत विश्व समता पुरस्कार २०२१ अशा अनेक प्रकाराच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झालेला आहे.
काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव म्हणून गौरविण्यात आले होते. तो भव्य असा कार्यक्रम मालगुंड येथे पार पडला होता. त्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री तसेच पालकमंत्री उदय सामंत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते. त्या बद्दल यांचे खडूच्या सहाय्याने फळ्यावर हुबेहुब चित्र रेखाटलेले होते. ते हुबेहुब चित्र पाहून मंत्री महोदयांनी त्यांचे खूप कौतुक केले होते. फलक लेखन असो किंवा चित्र रेखाटन असो ते सुंदर प्रकारे साकारतात.
शाम पवार यांना राष्ट्रीय स्तरावर कार्य करीत असलेल्या संस्थे मार्फत भारत भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्या बद्दल संपूर्ण तालुक्याला तसेच मालगुंड गावासाठी ती अभिमानाची बाब आहे. म्हणून त्यांचे मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम, तसेच सर्व संचालक मंडळाने व बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मालगुंड चे मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक उमेश केळकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. मालगुंड गावासाठी ही अतिशय भूषणावह गोष्ट आहे. शाम पवार यांना मिळालेल्या या राज्यस्तरावरील पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरावरून मित्र मंडळी शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांकडून कौतुक केले जात आहे, त्यांचे अभिनंदन देखील केले जात आहे, त्यांच्या हातून असेच अधिक चांगले काम घडत राहो अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत.

