(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील सकपाळवाडीमध्ये एका २७ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा अशोक सकपाळ (वय २७) हिने रविवारी दुपारी सुमारे २.३० ते ३ वाजण्याच्या दरम्यान घराशेजारील वाड्यातील लाकडी वाशाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळानंतर हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पाटील, साखरपा पोलीस पाटील शैलजा पवार तसेच उपसरपंच शशिकांत लिंगायत यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवला. दरम्यान, देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनीही प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

