(संगमेश्वर / एजाज पटेल)
“हर घर नळ से जल” अशी संकल्पना असलेल्या जलजीवन मिशन योजनेतून नावडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम ज्या ठेकेदाराने घेतले आहे. त्या ठेकेदारकडून भूमिगत जलवाहिनी टाकण्यासाठी येथील बाजारपेठेतील सिमेंट काँक्रेट रस्ता खोदण्यात आला. मात्र जलवाहिनी टाकून महिना उलटून गेला तरी खोदलेला रस्ता पूर्वीप्रमाणे न भरता तसाच सोडण्यात आल्याने चांगला रस्ता मातीमोल तर झालाच आहे. त्याहीपेक्षा वर विस्कटलेली खडी आणि वर आलेल्या लोखंडी सळ्या धोकादायक ठरत आहेत.
संगमेश्वर बाजारपेठेतील अंतर्गत असलेला रस्ता सिमेंट काँक्रेटचा आहे. रस्ता मजबुतीकरणासाठी लोखंडी सळ्यांचा सुद्धा वापर करण्यात आला आहे. हा रस्ता जलजीवन मिशन योजनेच्या नळपाणी योजनेची जलवाहिनी भूमिगत टाकण्यासाठी खोदण्यात आला. सबंधित ठेकेदाराने जलवाहिनी टाकून झाल्यानंतर पूर्वी प्रमाणे खोदाई करण्यात आलेला तो रस्ता काँक्रेटिकरण करून दुरुस्ती करण्याचे सोडून खोदाई करताना खड्ड्यातील बाहेर काढण्यात आलेली माती, दगड तसेच खडी टाकून वरच्यावर बुजवण्यात आला आहे.
जो रस्ता खोदण्यात आला आहे. तो बाजापेठेतील अंतर्गत रस्ता असून या रस्त्यालगतच राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँका, संस्था, दवाखाने, दुकानें असल्याने वाहन वर्दळीसह माणसांची या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. हे लक्षात घेऊन तरी खोदलेल्या रस्त्याची व्यवस्थित आणि वेळेवर दुरुस्ती करणे गरजेचे असताना नुसतेच वरवर मलमपट्टी करण्याचे काम केले आहे. याचा फटका वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना होत असून गेल्या काही दिवसात खोदण्यात आलेल्या व व्यवस्थित न बुजवलेल्या ठिकाणी वर आलेले लोखंडी सळ्यामध्ये अडकून महिला पडल्याच्या तसेच काहींच्या पायांना सळ्या लागून रक्तस्त्राव झाल्याच्या घटना घडत आहेत. तर लोखंडी सळ्यांनी वाहनांचे टायर सुद्धा पंक्चर होण्याचे प्रकार घडत आहेत. रस्त्यालगतच दुकाने असल्याने दुकानदार सुद्धा यातून सुटलेले नाहीत. चांगल्या रस्त्याची धुळधाण उडवल्याने वाहनांच्या रेलचेळीमुळे रस्त्यावरील धूळ दुकानातील समानावर बसत असल्याने सामानाची नासधूस होत असल्याने दुकानदारही कमालीचे त्रस्त झाले आहेत.
रस्ता खोदाई करण्याची परवानगी सबंधित विभागाकडून ठेकेदाराने घेतली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतानाच परवानगी असेल तरी त्या विभागाने रस्ता मजबुतीकरण व दुरुस्ती करण्याची ठेकेदाराला सूचना केली नव्हती का? किंवा सबंधित विभागाला अंधारात ठेऊन रस्त्याची खोदाई करण्यात आली का, असे अनेक प्रश्न याबाबत उपस्थित केले जात आहेत.