(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील आरवली गुरववाडी येथील गडनदीत बुडून बेपत्ता झालेल्या प्रशांत चा शोध सोमवारी घटना घडल्यापासून युद्धपातळीवर सुरु असताना तब्ब्ल ३६ ते ४० तासानंतर आज बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह याच नदीपात्रात तॊ ज्या जागी बुडाला तेथून काही अंतरावर पाण्यावर तरंगताना आढळून आला.
प्रशांत प्रभाकर भागवत (वय वर्ष 21) हा त्याची काकी प्रतीक्षा यादव ही कपडे धुवण्यासाठी येथील गडनदीवर गेली होती तिच्या बरोबर नदीत अंघोळ करण्यासाठी गेला होता. याचवेळी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात प्लास्टिक टफ वाहून गेला तॊ पकडण्यासाठी प्रशांत याने पाण्यात उडी घातली मात्र तॊ पुन्हा वर आलाच नाही. ही घटना 2 नोव्हेंबर सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली होती.
या घटनेची माहिती प्रशांत चे वडील प्रभाकर भागवत यांनी माखजन पोलीस दूरक्षेत्रात दिली होती. त्यांनी त्याच वेळी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तसेच पाण्यात बुडून तपास शोधकार्य करणाऱ्या घोडपी समाजाच्या काही लोकांच्या सहकार्याने तसेच नावेने युद्धपातळीवर शोधकार्य सुरु असताना तब्ब्ल दोन दिवसा नंतर बुधवारी सकाळी ज्या ठिकाणी उडी घातली त्या ठिकाणापासून काही अंतरावर प्रशांत याचा मृतदेह पाण्यावर तरंगाताना आढळला आहे.
प्रशांत याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईनकांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती. माखजन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांनी दिली असून पुढील अधिक तपास ते करत आहेत.