(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर एसटी स्टॅंडसमोर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात पोलिस प्रशासनाच्या मालकीचे बॅरिकेटर्स ठेकेदारच सर्रासपणे वापरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांना आवश्यक असणारी ही महत्वाची साधनेही आता ठेकेदारांच्या ताब्यात असून ती खासगी कामासाठी बिन्दास्तपणे वापरली जात आहेत.
विशेष म्हणजे, याच ठिकाणाच्या अगदी काही अंतरावरच पोलीस चौकी आणि नजरेसमोर पोलीस ठाणे असल्याने पोलिसांचा सततचा वावर असताना अशा प्रकारे सरकारी मालमत्तेचा गैरवापर होत असणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या नियमित नजरेत येणारी ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात नाही का, असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.
शासनाच्या मालमत्तेचा खासगी ठेकेदारांकडून वापर तोही कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय हा सरळसरळ नियमभंग आणि सार्वजनिक संपत्तीचा दुरुपयोग ठरतो. या प्रकरणावरून जनतेत तीव्र नाराजी असून प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेविषयीही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ माहिती घेऊन प्रशासनाच्या परवानगी शिवाय अशाप्रकारे मालमत्तेचा वापर केला जात असेल तर संबंधित ठेकेदारावर आवश्यक ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः वाहतूक सुरक्षा आणि पोलीस विश्वासार्हता धोक्यात आणणाऱ्या अशा घटनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, अशी येथील जनतेची भूमिका आहे.

