(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवांचा दर्जा उंचावून नागरिकांना अधिक सक्षम, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विकासाचा महत्त्वपूर्ण आढावा विधानभवनात घेण्यात आला. या बैठकीत नवीन इमारती, आवश्यक निधी, जागेची उपलब्धता, वैद्यकीय उपकरणे आणि इतर पायाभूत सुविधांबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीत खेड तालुक्यातील मौजे वावे येथील शासकीय रुग्णालय, चिपळूण तालुक्यातील मौजे रामपूर येथील श्रेणीवर्धित प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच गुहागर तालुक्यातील मौजे रामपूर येथील शासकीय आरोग्य संस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. खेड तालुक्यातील वावे येथील शासकीय रुग्णालयासाठी नवीन इमारत उभारण्याच्या प्रस्तावास गती देण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी आवश्यक निधी, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, जागेची उपलब्धता आणि इतर पायाभूत सुविधांबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
चिपळूण तालुक्यातील रामपूर येथील श्रेणीवर्धित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी किमान ६१ गुंठे जागेची आवश्यकता असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. सध्या केवळ ३३ गुंठे जागा उपलब्ध असल्याने उर्वरित जागा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सुमारे ४० गुंठे जागेतून उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय, गुहागर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीच्या जागी नवीन इमारत उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. आरोग्य सेवा संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढील कार्यवाही करावी, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य संस्थांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा विशेष बाब म्हणून विचार करून आवश्यक विकासकामांसाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बैठकीला आमदार भास्कर जाधव, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ. सुनीता गोलाईत, राजेंद्र भालेराव तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे रत्नागिरीचे जिल्हा शल्यचिकित्सक आणि कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक यांनीही सहभाग नोंदविला.

