(मुंबई / वृत्तसंस्था)
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईसह राज्यभरात गणरायाचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये उत्साहात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, आरती आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने मुंबईचे वातावरण भक्तिमय झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसह जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. गणेशोत्सवाचे औचित्य साधत उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. या प्रसंगी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. राज ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबाचे स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन बाप्पाची आरती केली.
राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या निमित्ताने शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले. उद्धव ठाकरे कुटुंबीयांचे राज ठाकरे यांनी स्वागत केले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबातील सदस्य एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे चुलत भाऊ आहेत. गेल्या काही वर्षांतील राजकीय मतभेदांनंतर अलीकडच्या काळात दोन्ही नेत्यांमधील संबंध पुन्हा चर्चेत आले आहेत. अशा परिस्थितीत गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन घेतलेले बाप्पाचे दर्शन कार्यकर्त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. ‘शिवतीर्थ’वरील दर्शनानंतर ठाकरे कुटुंबीयांनी काही वेळ एकत्र घालवला. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही त्याची चर्चा सुरू झाली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचेही दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, सुपुत्र आदित्य ठाकरे तसेच स्थानिक शिवसेना पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’ येथेही विधिवत पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’ येथेही गणेश चतुर्थीच्या मंगलमय वातावरणात श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. वर्षा निवासस्थानी दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. येथे विराजमान होणाऱ्या गणरायाच्या दर्शनासाठी राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहतात.
मुंबईत घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही स्थापना सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत भाविकांची गर्दी वाढली असून प्रशासनाकडून वाहतूक, सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गणरायाच्या आगमनामुळे मुंबईत भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी दिवसांत विविध गणेश मंडळांमध्ये धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. यंदा अनंत चतुर्दशी 25 सप्टेंबर रोजी असल्याने त्या दिवशी गणेश विसर्जनाचा मुख्य दिवस असेल.


