(मुंबई / वृत्तसंस्था)
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) रीतसर गुन्हा दाखल केला आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेली याचिका आणि CBIकडे नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे ही FIR नोंदवण्यात आली आहे. दिशाच्या मृत्यूमागे घातपात आणि कटकारस्थान असल्याचा संशय तिच्या पालकांनी व्यक्त केला होता. नव्या FIRमुळे या बहुचर्चित प्रकरणाच्या तपासाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
CBIने दाखल केलेल्या FIRमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, बॉलिवूड अभिनेते सूरज पांचोली आणि डिनो मोरिया यांच्यासह रोहन रॉय यांच्या नावांचा उल्लेख सतीश सालियन यांनी दिलेल्या जबाबात केला आहे. या प्रकरणात ठोस पुरावे मिळाल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
CBIने हत्या, बलात्कार किंवा सामूहिक अत्याचार, गुन्हेगारी कट आणि पुरावे नष्ट करणे यांसारख्या गंभीर आरोपांशी संबंधित कलमे FIRमध्ये लावली आहेत. भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३०२, ३७६, १२०-बी, २०१ तसेच २१७ आणि २१८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात नेमके कोण मुख्य आरोपी आहेत, याचा अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, राजकीय आणि बॉलिवूड क्षेत्रातील काही बड्या व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी होण्याची शक्यता आहे.
सतीश सालियन यांनी CBIकडे नोंदवलेल्या जबाबात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर संबंधित व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी तसेच कागदपत्रे, फाईल्स आणि इतर सार्वजनिक रेकॉर्ड नष्ट करण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. दिशाविरोधात गुन्हेगारी कट रचण्यात आला आणि त्यानंतर तिच्या मृत्यूची आत्महत्या असल्याची खोटी कहाणी तयार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे, रोहन रॉय, डिनो मोरिया, सूरज पांचोली, उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची CBIकडून चौकशी होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. सतीश सालियन यांच्या आरोपांच्या आधारे तपास करताना CBIला ठोस पुरावे मिळाल्यास त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या हाय-प्रोफाईल प्रकरणाच्या तपासासाठी CBIच्या दिल्ली मुख्यालयातील विशेष पोलीस उपअधीक्षक (DSP) पुराण सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पथक ८ जून २०२० रोजीच्या रात्री नेमके काय घडले होते, याचा तपास करणार आहे.
८ जून २०२० रोजी मालवणी (मालाड) येथील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय दिशा सालियन हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांनी, १४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह वांद्रे येथील घरात आढळला होता. दिशाने सुशांत सिंह राजपूतसोबत काही काळ काम केले होते. सुरुवातीच्या तपासात दिशाचा मृत्यू अपघात किंवा आत्महत्येमुळे झाल्याचे नमूद करण्यात आले होते.
मालवणी पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार, ८ जून २०२० रोजी रात्री दिशा तिचा प्रियकर आणि वाग्दत्त वर रोहन रॉय याच्या मालवणी येथील रिजेंट गॅलक्सी इमारतीतील १२व्या मजल्यावरील सदनिकेत मित्रमंडळींसोबत पार्टीत सहभागी झाली होती. मध्यरात्रीनंतर तिचा मृत्यू झाला. दिशाने कौटुंबिक आणि व्यावसायिक कारणांमुळे निराश अवस्थेत असल्याचे, त्या वेळी तिने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केल्याचे आणि त्यानंतर स्वतःला एका खोलीत कोंडून घेतल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. बराच वेळ तिने दरवाजा न उघडल्याने तो बळजबरीने तोडण्यात आला. त्यानंतर ती इमारतीबाहेर खाली पडल्याचे मित्रमंडळींना आढळले. त्यांच्या जबाबांच्या आधारे तिने आयुष्य संपवल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता.
मात्र, मार्च २०२५ मध्ये दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेनंतर प्रकरणाच्या तपासाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आणि आता CBIने FIR दाखल केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
दरम्यान, निलेश ओझा यांनी दिशाकडे आदित्य ठाकरे यांच्याबाबत काही माहिती आणि ड्रग्जसंदर्भातील पुरावे असल्याचा दावा केला आहे. हे पुरावे दिशाने सुशांत सिंह राजपूतला शेअर केले होते आणि सुशांतने ही बाब रिया चक्रवर्तीला सांगितल्याचे ओझा यांनी म्हटले आहे. रिया चक्रवर्तीने ही माहिती आदित्य ठाकरे यांना दिल्याचा दावाही त्यांनी केला. डिनो मोरिया, रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे हे ‘पार्टनर इन क्राईम’ असल्याचे सुशांतला माहीत नव्हते, त्यानंतर कट रचण्यात आला आणि सचिन वाझेला आणण्यात आल्याचा दावा निलेश ओझा यांनी पीटीआयशी बोलताना केला. दाखल झालेल्या FIRमध्ये एक नव्हे तर अनेक हत्यांचा उल्लेख असल्याचेही त्यांनी सांगितले.


