(रत्नागिरी / सिंधुदुर्ग)
तंत्रज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले असून काळानुसार त्यात सातत्याने बदल घडत आहेत. यांत्रिक साधनांपासून डिजिटल आणि स्मार्ट तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास आज सर्वच क्षेत्रांत दिसून येतो. घड्याळ, टीव्ही, रेडिओ, संगणक आणि मोबाईलप्रमाणेच आता वीज मोजणीच्या क्षेत्रातही स्मार्ट तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महावितरणकडून राज्यभर स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे) वीजमीटर बसवण्यात येत असून ९ ते २३ फेब्रुवारीदरम्यान ‘स्मार्ट मीटर पंधरवडा’ साजरा केला जात आहे. या निमित्ताने स्मार्ट मीटरचे फायदे अधिक ठळकपणे समोर येत आहेत.
महावितरण ही राज्यातील सुमारे ३ कोटी १६ लाख वीजग्राहकांना वीजपुरवठा करणारी शासकीय वीज वितरण कंपनी आहे. ग्राहकांना अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह वीजबिल मिळावे, यासाठी कंपनीने यापूर्वी फोटो मीटर रीडिंग, मोबाईल अॅपद्वारे रीडिंग आणि केंद्रीकृत बिलिंग प्रणाली यांसारखे उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. त्याच प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणून स्मार्ट टीओडी वीजमीटरचा अवलंब करण्यात आला आहे.
स्मार्ट टीओडी मीटरचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वयंचलित आणि अचूक मीटर रीडिंग. पारंपरिक पद्धतीत मानवी हस्तक्षेपामुळे रीडिंगमध्ये चूक होणे, अंदाजे बिल देणे किंवा रीडिंग न मिळाल्याने तक्रारी निर्माण होणे असे प्रकार घडत असत. स्मार्ट मीटरमुळे या अडचणी दूर होत आहेत. घर बंद असले किंवा कंपाउंड लॉक असले तरीही मीटर रीडिंग आपोआप घेतले जाते आणि त्यावर आधारित अचूक बिल तयार होते.
या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीजवापराची सविस्तर माहिती मोबाईलवर सहज उपलब्ध होते. तासागणिक वीजवापर, व्होल्टेज, वीजभार याची आकडेवारी पारदर्शकपणे पाहता येते. त्यामुळे ग्राहकांना स्वतःचा वीजवापर नियंत्रित करण्यास मदत होते.
स्मार्ट टीओडी मीटरमुळे वीजदरात थेट सवलतीचाही लाभ मिळत आहे. टीओडी प्रणाली अंतर्गत सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत वापरल्या जाणाऱ्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपयांपर्यंत सवलत देण्यास महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. ही सवलत १ जुलै २०२५ पासून लागू झाली असून, घरगुती ग्राहकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे स्मार्ट वीजमीटर महावितरणकडून पूर्णतः मोफत बसवण्यात येत आहेत. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच हे मीटर पोस्टपेड स्वरूपाचे असून सध्याप्रमाणेच मासिक बिलिंग प्रणाली कायम ठेवण्यात आली आहे.
सौर ऊर्जेच्या दृष्टीनेही स्मार्ट टीओडी मीटर अत्यंत उपयुक्त आहेत. नेट मीटरिंग प्रणालीमुळे छतावरील सौर प्रकल्पातून निर्माण होणारी व वापरली जाणारी वीज, तसेच ग्रीडला दिलेली अतिरिक्त वीज याचा अचूक हिशेब ठेवणे शक्य होते. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सौर प्रकल्प बसवणाऱ्या ग्राहकांसाठी हे मीटर विशेष फायदेशीर ठरत आहेत.
एकूणच स्मार्ट टीओडी मीटर म्हणजे अचूक बिलिंग, पारदर्शकता, वीजदरातील सवलत आणि आधुनिक ग्राहक सुविधा यांचा समतोल संगम आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्मार्ट मीटर बसविणे ही काळाची गरज असून, त्याचा थेट लाभ वीजग्राहकांनाच होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी या उपक्रमाला सहकार्य करून अचूक बिलिंग आणि सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

