(फलटण / सातारा)
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रूपनवर यांच्या हातावर “माझा संशयास्पद मृत्यू झाल्यास माजी मंत्र्यांचा पीए जबाबदार राहील” असा मजकूर लिहिल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. या घटनेप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी दोन विशेष पथके नियुक्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 7.15 वाजता फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात हा प्रकार घडला. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्यासह काही जण उपस्थित होते. याचवेळी प्रसाद प्रदीप कोंडेदेशमुख (रा. जावली, जि. सातारा) आणि त्याच्यासोबत आलेल्या काळ्या सफारी पोशाखातील एका अनोळखी व्यक्तीने अरेरावीची भाषा वापरत दमदाटी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, वाद वाढल्यानंतर सफारी पोशाखातील व्यक्तीने डॉ. रूपनवर यांच्या अंगावर धाव घेत त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली आणि “मार दूंगा” अशी धमकी दिली. त्यानंतर प्रसाद कोंडेदेशमुख यांनी “हे तुला खूप महागात पडेल, उद्या सकाळी समजेल मी कोण आहे,” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक गाजरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, डॉक्टरांच्या हातावर लिहिलेल्या संशयास्पद संदेशाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन स्वतंत्र तपास पथके स्थापन केली असून, घटनेमागील नेमके कारण, धमकीचे स्वरूप आणि इतर संबंधित बाबींचा सखोल तपास सुरू आहे.
यापूर्वी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयातील कामकाज, प्रशासकीय वातावरण आणि डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा राज्यभर चर्चेत आला होता. त्याची चर्चा अद्याप सुरू असतानाच आता वैद्यकीय अधिकाऱ्याला कथित धमकी, मानसिक दबाव आणि त्यानंतर व्हायरल झालेल्या संदेशामुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

