( मुंबई )
देशात सध्या सायबर फसवणूकीची प्रकरणे वाढत आहेत. सायबर गुन्हेगार आता लोकांना नवनवीन मार्गाने फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मिस्ड कॉल घोटाळ्यानंतर आता एक नवीन घोटाळा समोर आला आहे. यामध्ये सायबर गुन्हेगार आपल्याला ओटीपी न विचारता आपले बँक खाते रिकामे करू शकतात. या घाेटाळ्याला “कॉल मर्जिंग” घोटाळा म्हटले जाते.
यूपीआयने या घोटाळ्याबद्दल इशारा देऊन लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. या नवीन घोटाळ्यात फक्त एक कॉल येतो आणि आपले खाते काही मिनिटांत खाली होते. काॅल करून सायबर चोरटे वापरकर्त्यांना कॉल मर्ज करण्यास सांगून त्यांना माहित नसतानाही ओटीपी घेऊ शकतात. तर आपण ओटीपी देत असल्याचे वापरकर्त्यांना माहितही नसते. ओटीपी मिळाल्यानंतर चोरट्यांना इतर कोणत्याही परवानगीची आवश्यकता भासत नाही. त्यानंतर बँक खात्यातून पैसे काढले जातात. या प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सरकार आणि इतर एजन्सी सतत लोकांना सावध राहण्याचा सल्ला देतात.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) वापरकर्त्यांना आपल्या एक्स खात्यावर या नवीन घोटाळ्याबद्दल चेतावनी दिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, घोटाळेबाज आपली फसवणूक करण्यासाठी कॉल मर्जिंगचा वापर करत आहेत. एनपीसीआयने ही माहिती देताना लोकांना जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे. या पोस्टमध्ये यूपीआयने हा घोटाळा केला जातो आणि हे कसे टाळता येईल हे देखील स्पष्ट केले आहे.
आपल्याला एखाद्या अनोळखी व्यक्तीचा कॉल येतो. तो म्हणतो की त्याला तुमचा नंबर मित्राकडून मिळाला आहे. अनोळखी व्यक्ती पुढे म्हणते की, तो आपल्याला एखाद्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करू इच्छित आहे. दरम्यान, आपल्याला आणखी एक कॉल येतो. यावर एक अनोळखी म्हणेल की, व्हीआयपी नंबरवरून कॉल करीत असलेल्या आपल्या मित्राचा हा फोन आहे. तो तुम्हाला कॉल मर्जिंग करण्यास सांगेल. मात्र आपण कॉल मर्ज करताच आपल्या खात्यातून पैसे काढले जातील. या काॅलमुळे आपले व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा गूगल खातेही हॅक केले जाऊ शकते.
यामध्ये आपण कोणताही ओटीपी दिला नाही, कोणत्याही लिंकवर क्लिक केले नाही किंवा कोणतेही अॅप डाऊनलोड केले नाही, तरीही आपले खाते हॅक केले गेले. वास्तविक आपल्याला मिळालेला दुसरा कॉल ओटीपीचा होता. यापूर्वी एसएमएसवर येत असलेले कॉल आता कॉलवर येतात. आपण कॉल मर्ज करताना सायबर चोरट्याला ओटीपी मिळतो. आपल्या लक्षात येईपर्यंत पैसे आपल्या खात्यातून गेलेले असतात.
आपण आपल्या नंबरवर अज्ञात नंबरचा कॉल आला आणि कॉल मर्जिंग करण्यास सांगितले तर सावध रहा आणि कॉल मर्जिंग करू नका. कोणी आपल्या बँक किंवा कोणत्याही माहितीसाठी कॉल करण्याचा दावा करीत असेल तर प्रथम कॉलरची ओळख तपासा. आपल्याला आपल्या माहितीशिवाय ओटीपी मिळाल्यास, 1930 क्रमांकवर त्वरित तक्रार करा. यामुळे आपल्या बँकेला फसवणूकीबद्दल कळू शकेल आणि आवश्यक पावले उचलता येतील.