(मुंबई / वृत्तसंस्था)
राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील 3,195 शासकीय रुग्णवाहिकांसाठी ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ उपक्रम सुरू करण्यात आला असून, यामुळे रुग्णवाहिकांच्या इंधन व्यवस्थापनात पारदर्शकता आणि वेग येणार आहे. याचबरोबर, यापूर्वी केवळ माता व बालकांसाठी उपलब्ध असलेली 102 अॅम्ब्युलन्स सेवा आता सर्व रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
3,195 रुग्णवाहिकांना मिळणार कॅशलेस पेट्रोकार्ड
राज्यातील शासकीय रुग्णवाहिकांना वेळेवर इंधन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 3,195 रुग्णवाहिकांना HPCL (हिंदुस्तान पेट्रोलियम) कंपनीचे कॅशलेस पेट्रोकार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे इंधन खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल होणार असून आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता टाळण्यास मदत होईल.
102 अॅम्ब्युलन्स सेवा आता सर्वांसाठी
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, यापूर्वी 102 रुग्णवाहिका सेवा मुख्यतः माता आणि बालकांसाठी वापरली जात होती. आता ही सेवा सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच 102 अॅम्ब्युलन्स सेवा अधिक सक्षम करून 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेला प्रभावी पर्याय तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाचा अधिक वापर
प्रकाश आबिटकर म्हणाले की, आरोग्य सेवा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची व्यवस्था असून, तिच्यात तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करणे काळाची गरज आहे. ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’मुळे रुग्णवाहिकांच्या इंधन व्यवस्थापनात पारदर्शकता वाढेल, अनावश्यक विलंब कमी होईल आणि संपूर्ण प्रणाली अधिक उत्तरदायी बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपत्कालीन सेवा अधिक जलद आणि प्रभावी होणार
एचपीसीएलच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी मॉनिटरिंगच्या माध्यमातून नागरिकांना अधिक जलद, सुरक्षित आणि दर्जेदार आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही सांगण्यात आले.
कोरोना काळातील आरोग्य यंत्रणेच्या कामाचे कौतुक
कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेची आठवण करून देत आरोग्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही नागरिकांसाठी मोठा आधार आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने सेवाभाव आणि जबाबदारीची भावना ठेवून काम करावे, जेणेकरून नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल.
‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य आयुक्तालय, आयटी विभाग, प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित संस्थांचे प्रकाश आबिटकर यांनी विशेष अभिनंदन केले. भविष्यातही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

